Monday, 6 January 2020



दैनिक स्वगत  ०६-०१-२०२०

पत्रकार एक मित्र, सोबती आणि मार्गदर्शक


            आज पत्रकार दिन. महाराष्ट्र शासनाने जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचे प्रस्तावित केले आणि त्यानुसार दरवर्षी हा दिवस पत्रकारांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो. जानेवारी १८३२ रोजी "दर्पण" या नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले जुलै १८४० मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. भाऊ महाजन ही त्यांचे बरोबर होतेच.

             पत्रकार एक अशी व्यक्ती असते जी आसमंतात घडणाऱ्या घटनांची माहिती घेऊन, त्याचे विश्लेषण करते. त्यानंतर त्या घटनेचे  शब्दांकन करून समाजापुढे सादर करीत असतेरस्ता दाखवण्यासाठी जसा वाटाड्या असतो तसाच पत्रकार हा आसमंतात घडणाऱ्या घटनांचे आकलन करून देणारा त्याला शब्दबद्ध करुन त्याचे सादरीकरण करणारा कलावंत असतो असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. घटना कोणत्याही प्रकारच्या असोत त्या समस्त घटनांचे शब्दांकन करणारा तो एक "शब्दकार" असतो. पत्रकाराला ही घरदार असते, संसार असतो, आप्तस्वकीय असतात. या सर्वांना सांभाळून घेत समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेला असा समाज बांधव म्हणजे पत्रकार होय

             १८३२ मधील पत्रकारिता आणि आज सुमारे १८८ वर्षानंतरची एकविसाव्या शतकातील पत्रकारिता यात जमीन-अस्मानचा फरक पडलेला आहे. कधी एके काळी समाज जागृती या धोरणांनी सुरु झालेला वृत्तपत्राचा प्रवास आज समाजमनाला प्रदर्शित करणारा एक आरसा झालेला आहे असे म्हणल्यास चुकीचे होणार नाही. आजमितीस बातम्यांचे व्यापकत्व वाढलेले आहे. अनेक प्रकारच्या घटना समाजामध्ये घडत आहेत. त्या घटनांच्या मागील विचारसरणीत एक मोठे वैचारिक द्वंद्व कार्यरत झालेले आहे. त्या सर्व घटनांना ज्या-त्या परिभाषेत शब्दांकन करणे हे वाटते तितके सोपे काम राहिलेले नाही आजचा पत्रकार हे आवाहन लिलया पेलतो आहे असे नजरेस पडते आहे

              पूर्वी संपादक हाच वृत्तपत्राचा संस्थापक असावयाचा. पदरमोड करीत म्हणजेच स्वतःच्या खिशाला नुकसानीत ठेवून हा पत्रकार आपली समाजसेवा करीत असे. आज वृत्तपत्रसृष्टीतील वास्तव खूप बदललेले आहे. वृत्तपत्रे ही "व्यावसायिक झाली आहेत का बाजारु" या विषयावर आम्ही आज भाष्य करणार नाही आहोत. कारण भांडवला शिवाय वृत्तपत्र चालत नाही आणि भांडवल आले की नफ्याचा विचार करणारी मनोवृत्ती आलीच हे विसरता येत नाही

             खरेतर वृत्तपत्रसृष्टीच्या अर्थकारणावर सरकारनेच श्वेतपत्रिका काढली पाहिजे. लोकशाहीच्या चार स्तंभापैकी वृत्तपत्र हा एक असा स्तंभ आहे जो प्रामुख्याने स्वतःच्या भांडवलावरती म्हणजेच आर्थिक गुंतवणुकीवर चालत असतो. बाकी न्यायालय, प्रशासन आणि संसद या तिन्ही साठी सरकारी पैसा खर्च होत असतो. ते भाग्य वृत्तपत्राच्या नशिबी नाही.  


                  वृत्तपत्रे ही समाज जीवनातील अविभाज्य घटक बनलेली आहेत. वार्तांकन करणाऱ्या अनेक पद्धती जरी अस्तित्वात आलेल्या असल्या तरीही छापील वृत्तपत्राच्या बातमीवर अधिक विश्वास ठेवण्याची मनोवृत्ती कमी झालेली नाही. याला कारण काय असा जर का थोडा विचार केला तर बातमी देताना  संबंधित मजकुरावर जो संस्कार करावयाचा  असतो तो वृत्तपत्रातील बातमीवर अधिक चांगल्या पद्धतीने करीत असतो हे लक्षात घेतले पाहिजे. संस्काराचे हे काम पत्रकार करतो हे आपणास विसरून चालणार नाही. वृत्तपत्रांच्या बातम्यांमधून ठळकपणा अधिक असतो. उथळपणा कमी. आपण हे असे निरीक्षण केल्यास लक्षात येईल. वृत्तपत्रातील बातमी छापली जाण्यापूर्वी उपसंपादक आणि संपादक हे ती बातमी बातमी नजरेखालून घालत असतात. त्यानंतर आवश्यक ते आणि अपेक्षित असे संस्कार त्या बातमी वर करून मगच ती प्रकाशनास सोडली जात असते. म्हणूनच अन्य कोणत्याही माध्यमांपेक्षा वृत्तपत्रातील बातमी अधिक विश्वासार्ह असावी असे समजण्यास हरकत नाही

                अपवाद वगळता संपादक मालक असणारा पत्रकार  आज राहिलेला नाही. पत्रकार ही जशी नोकरी झाली आहे तसेच संपादक पद हे सुद्धा नोकरीचेच एक पॅकेज या प्रभागात गणले जाऊ लागले आहे. एकेकाळी वृत्तपत्राची धोरणे आणि उद्दिष्टे ही संपादक म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार निश्चित करीत होता. आता हे काम वृत्तपत्राच्या मालकाकडे गेलेले आहे. वृत्तपत्राचा मालक हा पत्रकार असेलच असे म्हणणे आता धाडसाचे होणारे आहे. कारण वृत्तपत्र हा समाजसेवेचा एक भाग राहता व्यवसाय अथवा धंदा या स्वरूपात त्याची गणना होऊ लागलेली आहे. मालक संपादक ज्या धीटपणाने आणि थेटपणाने आपले म्हणणे मांडू शकत होता आपले मत प्रकाशित करु शकत होता, ती धीटाई आणि थेटपणा आता लोप पावत चाललेला आहे असे म्हणावेसे वाटते.

                 सर्वच व्यवसायात आणि धंद्यात असतात तसे काही दुर्गुण आणि अपप्रवृत्ती पत्रकारिता क्षेत्रांमध्ये नक्की आहेत. पण त्यामुळे संपूर्ण पत्रकार जगताला जर कोणी नावे ठेवत असेल त्यांचेबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल तर तो शहाणपणा नव्हे असे आवर्जून सांगावेसे वाटते. आम्हास कल्पना आहे की पत्रकार त्याच्या पदाचा गैरवापर जरूर करत असेल. पण तो सार्वत्रिक नियम नाही. तो अपवाद आहे. अश्या घटनांना समाजापुढे आणणे आपणा वाचकांचे जनतेचे कर्तव्य आहे. तसे लक्षात आले तर ते एक सामाजिक जबाबदारी समजून उघड केले पाहिजे.

                व्यवसायाने जरी चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी एक अभ्यास म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण आम्ही घेतलेले आहे. याचे स्फुरण अर्थातच आम्हास मिळाले ते सोलापुरातील सुप्रसिद्ध रंगनाथ माधव तथा रंगा वैद्य या मुल्य जपणार्या तथा हाडाच्या पत्रकारामुळे. आज त्यांची आठवण तर येणारचपत्रकार हा एक मित्र, सोबती आणि मार्गदर्शक आहे या मताचे आम्ही आहोत. अर्थात तुम्ही त्याच्याशी कसे संबंध ठेवता यावर ते अवलंबून आहे. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व पत्रकार बंधूंचे अभिनंदन करीत आहोत त्यांना शुभेच्छा देत आहोत. समस्त पत्रकारबंधु करीत असलेल्या समाजसेवेचे आम्ही जाहीर कौतुक करीत आहोत.

श्रीनिवास माधवराव वैद्य 
चार्टर्ड अकाउंटंट 
भ्रमणध्वनी क्रमांक-९४ २०२ ६५६५६



No comments:

Post a Comment